
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आज शिवसेना डोंबिवली पश्चिम मध्यवर्ती शाखेत मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी सदिच्छा भेट दिली. शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांनी चहापान घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
काही दिवसांपूर्वी कल्याण शीळ रोडवरील रखडलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या आंदोलनात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र सहभाग घेतला होता. यानंतर आज दोन्ही पक्षांचे शहरप्रमुख एकत्र आले. या भेटीदरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. चहापानाच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश तेलगोटे म्हणाले, ही मैत्रीपूर्ण भेट होती. याआधीही शिवसेना आणि मनसे शहराच्या प्रमुख प्रश्नावर एकत्र आले आहेत.
भेटीचा मनापासून आनंद
डोंबिवली मध्यवर्ती शाखेला भेट दिल्यानंतर राहुल कामत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयालाही भेट दिली. मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनीही शिवसेना शाखेला भेट दिल्याचा मनापासून आनंद व्यक्त केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांना मनसे कार्यालयात येण्याचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक तात्या माने, उपशहर संघटक संजय पाटील, शाम चौगले, सुरेश परदेशी, राजेंद्र सावंत, रिचा कामतेकर, सुरेखा ठाकूर, प्रियांका विचारे, रमा म्हात्रे आदी उपस्थित होते.




























































