
भविष्यकाळ हा गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बळावर पोलीस यंत्रणेला घटना घडल्यानंतर जागच्या जागी गुह्याची उकल करणे शक्य होणार आहे. घटनास्थळीच पुराव्यांची जागच्या जागी फॉरेन्सिक चाचणी करणाऱ्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स राज्यभर उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुराव्याअभावी गुन्हेगार सुटणे जवळजवळ अशक्य होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचे आज लोकार्पण करण्यात आले. या व्हॅन्स म्हणजे चालत्याफिरत्या फॉरेन्सिक प्रयोगशाळाच आहेत. या व्हॅनमधील किटच्या माध्यमातून शंभर टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळीच काढता येणार आहे. घटनास्थळी जाऊन जागच्या जागी पुराव्यांची तपासणी करेल. पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानही वापरले जाणार आहे. 21 व्हॅन्स सध्या कार्यरत असून अशा 256 व्हॅन्स तयार केल्या जाणार आहेत.
मोबाईल व्हॅनमध्ये काय असेल
रक्त, अमली पदार्थ, स्फोटक पदार्थ, सीमेनचे नमुने चाचणीची यंत्रणा, सायंटिफिक अॅनालिस्ट, केमिकल अॅनालिस्ट या तज्ञांची उपस्थिती, नमुने जपून ठेवण्यासाठी फ्रीज, नमुन्यांची सील योग्य प्रकारे होतेय की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही पॅमेरे व्हॅनमध्ये असतील.