
गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात ध्वनिप्रदूषण आणि अन्य विषयातील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिले. गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात ध्ननिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पण याच सभागृहात यापूर्वी मुख्यमंत्र्यानी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाहीत. हे सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे केली.
त्यावर उत्तर देताना मंत्री आशीष शेलार म्हणाले की, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे जाणूनबुजून करीत नाहीत. पण ध्वनिप्रदूषणाबाबत कोणीतरी तक्रार करते आणि त्यातून काही मंडळावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. पण सामाजिक व राजकीय गुह्यांच्या बाबतीत केसेस मागे घेण्याच्या संदर्भातील समितीचा सदस्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळावर सामाजिक व राजकीय हेतूने ध्वनिप्रदूषण व अन्य विषयातील गुन्ह्यांबाबत सरकारने समितीसमोर विषय आणला तर निर्णय घेतला जाईल आणि गणेश भक्तांसोबत गणेश मंडळांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन शेलार यांनी दिले.