
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला दोन महिन्यांचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले. नंतर पैसे येण्याचे बंद झाले. लाडक्या बहिणी आजही आशेवर आहेत की त्यांना दोन महिन्यांचे पैसे मिळाले. पुढचे पैसे मिळणार की नाही, असा सवाल विचारत भाजप आमदार राम कदम यांनी आज महायुती सरकारची विधानभेत पोलखोल केली.
माहितीच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना राम कदम म्हणाले की, एका गंभीर विषयात अध्यक्षांच्या निर्देशाची आवश्यकता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी घाटकोपरमधील स्थानिक आमदार म्हणून मी प्रत्येक घरातून फॉर्म भरून घेतले. पण काही महिलांना एक, दोन महिन्याचे पैसे आले. नंतर पैसे येण्याचे बंद झाले. पैसे येणे का बंद झाले हे महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना हे कळावे यासाठी वेबसाईट असावी. पैसे न येण्याचे काय कारण आहे. त्याचे कारण कळले पाहिजे. यासाठी सरकारने निर्देश द्यावेत अशी मागणी राम कदम यांनी केली. त्यावर विरोधी बाकाच्या सदस्यांनी शेम शेमच्या घोषणा सुरू केल्या.
वस्तुस्थिती मांडल्याबद्दल अभिनंदन; आदित्य ठाकरे यांचा टोला
त्यानंतर आदित्य ठाकरे उभे राहिले आणि म्हणाले की, अनेक महिलांना वाटते की आपल्याला फसवले आहे. ही वस्तुस्थिती आहे. बँकेच्या खात्यात कमी पैसे दिले, त्यांची नावे कमी केली आहे. लाडकी बहीण योजनेत कशी फसवणूक होत असल्याचे आम्ही सांगत होतो आणि राम कदम यांनी ते सभागृहासमोर आणले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असा टोला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मारला.