Monsoon Session 2025 – कोण वाघ आहे कोण कुत्रा हे जनता दाखवून देईल! निशिकांत दुबेच्या वक्तव्याचे परिषदेत पडसाद

ज्या राज्यात आपण राहतो, जे राज्य आपल्याला पोसते त्या राज्याची भाषा आपल्याला यायला पाहिजे. पण काल एका टिनपाट खासदाराने मराठी माणसाबद्दल वक्तव्य केले आहे. त्या खासदाराला एकदा महाराष्ट्रात बोलवा मग कोण वाघ आहे कोण कुत्रा आहे हे महाराष्ट्रातील जनता दाखवून देईल, असे आव्हान शिवसेना आमदार अनिल परब यांनी राज्य सरकारला दिले.

झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अनिल परब यांनी 289 नुसार स्थगन प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. दुबे हे भाजपचे लोकसभेचे सदस्य असून त्यांचे वक्तव्य हे भाजपचे अधिकृत मत आहे का, की, निवडणुकीच्या पूर्वीची ही तयारी आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, दुबे यांच्या वक्तव्याशी सरकार म्हणून आम्ही कोणीही सहमत नाही आणि त्यांच्या कुठल्याही वक्तव्याचे आम्ही समर्थन केलेले नाही. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असा खुलासा मंत्री उदय सामंत यांनी केला.