
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण पसरविणारे रासायनिक उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात प्रक्रिया करून तयार झालेला शेकडो टन घनकचरा व राख बोरज धरण परिसरातील मोकळ्या जागेत पसरवून त्यावर माती टाकून लपवण्यात येत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
रासायनिक घनकचऱ्याचे पाणी धरणातील जलाशयात मिसळल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. लोटे औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा व प्रक्रिया न केलेले सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार वारंवार घडतात. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे कारखानदारांशी संगनमत असल्याने दोषी कारखानदारांवर कारवाई केली जात नाही याकडे भास्कर जाधव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत मनीषा चौधरी, योगेश सागर, शेखर निकम आदींनी भाग घेतला.
नुकसानभरपाई द्या
खाडीतील प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली. 2009 ते 2014 मध्ये मत्स्य विकास मंत्री असताना मासेमारांना नुकसानभरपाई दिली आहे. त्या धर्तीवर मदत देण्याची सूचनाही भास्कर जाधव यांनी केली.
श्वेतपत्रिका काढा
प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नाही. प्रदूषण करणारे किती कारखाने आहेत, किती कारखान्यांवर कारवाई झाली त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.