
एसटी महामंडळातील होर्डिंग व डिजिटल जाहिरातीला नियमबाह्य परवाना आणि एसटी बस खरेदीला दिलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आज विधानसभेत धारेवर धरले. एसटी महामंडळात टेकसिद्धी अडव्हर्ट कंपनीला देण्यात आलेले कंत्राट व त्यातून झालेल्या नुकसानीच्या संदर्भात आमदार शंकर जगताप, सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्न उपस्थिती केला होता. त्यावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला.
एसटी महामंडळाच्या जाहिरात प्रकरणी अतिरिक्त प्रधान सचिव परिवहन यांनी मंत्री महोदयांची चौकशी करण्याचे आदेश 16 मार्च रोजी दिले होते. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन सरकारने दिले होते, यातील कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे? नियोजन आणि पणन विभागाने सादर केलेल्या कंपनीच्या करार पत्राच्या मंजुरी पत्रावर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुवेसकर यांची सही आहे. तांत्रिकदृष्ट्या तत्कालीन अध्यक्ष व सध्याचे मंत्री भरत गोगावले हे तेव्हा अध्यक्ष होते या संबंधितांच्या विरोधात सरकार कोणती कारवाई करणार आहे, असा सवाल केला. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, सुनील प्रभू सभागृहाला खोटी व चुकीची माहिती देत आहेत. हा विषय होर्डिंगच्या जाहिरातीच्या संदर्भात आहे.
मंत्र्यांच्या उत्तरावर हरकत घेत सुनील प्रभू म्हणाले की, या सभागृहात सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जर हे प्रकरण खोटे असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्थगिती का दिली, असा सवाल त्यांनी केला. मी जर खोटे बोललो असेन तर महाराष्ट्राची माफी मागायला तयार आहे.
अध्यक्षांची परिवहन मंत्र्यांना समज
या चर्चेत हस्तक्षेप करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सन्माननीय सदस्य काही माहिती जेव्हा सभागृहाला देतात तेव्हा नेहमीच समाजतो की ती माहिती सत्य आहे किंवा आपल्याकडे काही वेगळी माहिती असेल तर खोटी न म्हणता चुकीची आहे, असे म्हणावे, अशा शब्दांत परिवहन मंत्र्यांना समज दिली.