मान्सून… चार दिवस आधीच केरळात! हवामान विभागाची वर्दी,27 मेपासून बरसणार

नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून 27 मे रोजी केरळच्या किनाऱयावर पोहोचणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनदरम्यान केरळमध्ये दाखल होतो. मान्सून 27 मे रोजी आला तर 2009 नंतर पहिल्यांदाच तो केरळमध्ये इतक्या लवकर पोहोचेल. 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले आहे. दक्षिण भारतात सुरू असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस, दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱयांची स्थिती, नैऋत्य आणि वायव्य हिंदी महासागरातील वाऱयाची दिशा आणि वेग मान्सूनसाठी पोषक आहे. मान्सून 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल. पुढील आठवडय़ापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. 13 मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

यंदा 105 टक्के पाऊस
यंदा जून ते सप्टेंबरमध्ये मान्सून नेहमीपेक्षा चांगला असेल. हवामान विभाग 104 ते 110 टक्के पाऊस सामान्यपेक्षा चांगला मानतो. हे पिकांसाठी एक चांगले संकेत आहे. 2025 मध्ये 105 टक्के म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले.

देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस मान्सून हंगामात पडतो. देशातील 70 ते 80 टक्के शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहेत. याचा अर्थ असा की, चांगला किंवा वाईट मान्सूनचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.