
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात आणखी एका बीएलओने SIR च्या कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. भोजपूर भागातील बहेरी गावातील शिक्षक सर्वेश सिंग यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते भगतपूर पोलीस ठाणे परिसरातील जाहिदपूर सिकंदरपूर कंपोझिट स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होते आणि सध्या बीएलओ म्हणून कार्यरत होते.
मुरादाबाद जिल्ह्यात SIR कामाच्या दबावाखाली आणखी एका बीएलओ कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. भोजपूर भागातील बहेरी गावातील रहिवासी आणि जाहिदपूर सिकंदरपूर येथील कंपोझिट स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक असलेले सर्वेश सिंग यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत्यूपुर्वी त्यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, SIR मध्ये जास्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कुटुंबाची चिंता सतावत आहे. आता कामाचा ताण असह्य होत आहे. त्यामुळे मला रात्री झोपही येत नाही. असे नोटमध्ये नमूद करत त्यांनी जीवन संपवले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे आणि कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
जाहिरात
सर्वेश सिंग यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. ती त्यांनी मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिली होती. या पत्रात त्यांनी SIR चा दबाव आणि जास्त कामाचा ताण हे त्यांच्या त्रासाचे कारण असल्याचे नमूद केले आहे. सर्वेश सिंह यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, मी दिवसरात्र काम करत आहे, तरीही मी SIR चे लक्ष्य साध्य करू शकत नाही. अनेक रात्री अडचणीत आणि चिंतेत घालवल्या आहेत. मी फक्त २ ते ३ तास झोपू शकतो. माझ्या ४ मुली आहेत, त्यापैकी २ मुली आजारी आहेत. कृपया मला माफ करा. अलिकडच्या काळात सतत सर्वेक्षण आणि अहवाल देण्याच्या ओझ्यामुळे त्यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार सिंह म्हणाले की, एका बीएलओने आत्महत्या केली आहे. त्याच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. तथापि, त्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही मदत केली. त्याने आत्महत्या का केली हे शोधण्यासाठी प्रशासकीय आणि पोलिस तपास सुरू आहे. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि आम्ही त्याच्या कुटुंबाला शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करू, असे प्रशासनाने म्हटले आहे.



























































