पेणच्या 45 हजार बाप्पांची परदेशवारी, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मागणी

गणरायाच्या मूर्तीसाठी फक्त मुंबईसह देशातच नाही तर जगात प्रसिद्ध असलेल्या पेणमधून यंदा 45 हजार बाप्पांची परदेशवारी झाली आहे. गेल्या वर्षी पेणमधून 26 हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या होत्या. यंदाही ही संख्या दुपटीने वाढली आहे. पेणमधील मूर्ती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि थायलंड आदी देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव हा पूर्वी महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. मात्र आता हा सण देशविदेशात साजरा करण्यात येत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले हिंदुस्थानी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यावर्षी सुमारे 45 हजार गणेशभक्तांनी पेणच्या गणपती मूर्ती कारखानदारांकडे मूर्तीची मागणी केली होती. त्यानुसार येथील कारखानदारांनी 45 हजारांहून अधिक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या आहेत. ही मूर्ती पाठवण्याची प्रक्रिया मार्च महिन्यात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली आहे. जगभरातून बाप्पांच्या मूर्तीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे असे श्रीकांत देवधर यांनी सांगितले.

दोन फुटांच्या मूर्तीना अधिक पसंती
परदेशात मागविण्यात आलेल्या मूर्तीपैकी 60 टक्के मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत आहेत, तर उर्वरित मूर्ती त्याहून अधिक उंचीच्या आहेत. या मूर्तीमध्ये सिंहासनावर विराजमान गणपती मूर्ती, दगडूशेठ हलवाई, बालगणेश या मूर्तीना मागणी आहे. गणपती मूर्तीना कापडी फेटा, कापडी धोतर, शेला यासह डायमंड, इमिटेशन ज्वेलरीने सजविण्यात आले आहे.

महिला बचत गटांनी तयार केल्या दीड लाख मूर्ती
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पेण तालुक्यातील विविध बचत गटातील 228 महिला या गणेशमूर्तीच्या व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी 1 लाख 56 हजार 20 गणपती मूर्ती तयार केल्या असून यामधील 1 हजार 500  गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत.