
राज्यातल्या महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी ‘हायवे मृत्युंजय दूत’ ही योजना सुरू केली आहे, पण तरीही विविध कारणांमुळे राज्यातल्या महामार्गांवरील अपघातात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मागील पाच वर्षांपासून आतापर्यंत महामार्गांवरील अपघातात तब्बल 78 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर एक लाखाहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
राज्यात महामार्गांची संख्या वाढत गेल्यावर अपघातांची संख्याही वाढत आहे. मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर या महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती.
अपघातांची काही प्रमुख कारणे
महामार्गांवरील अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन आणि ‘लेन कटिंग’ हे सर्वात प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. महामार्गांवर वेगमर्यादेचे फलक लावलेले असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे पालन होत नाही. काही महामार्गांवर खास करून समृद्धी महामार्गावर महामार्ग संमोहनामुळे अपघात होतात. म्हणजे एकाच दिशेने गाडी बराच वेळ चालवल्याने चालकाला तंद्री लागते आणि त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. मद्यपान करून गाडी चालवल्यानेही अपघात होतात. 70 टक्के अपघात हे चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याने होतात असे आढळून आले आहे.
महामार्गांवर आयटीएमसी प्रणाली
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर या वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात 11 जणांचा अपघातात मृत्यू झाला, तर समृद्धी महामार्गावर याच काळात 55 जणांचा मृत्यू झाला. महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमसी) लावण्यात येत आहे.
‘गोल्डन अवर’मध्ये मदत महत्त्वाची
महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्गांवर अपघात झाल्यावर ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना मदत मिळण्यासाठी मार्च 2021 पासून ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अपघातग्रस्तांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
वर्ष अपघात संख्या मृत्यू गंभीर जखमी
2020 10,773 11,569 13,971
2021 12,554 13,528 16,073
2022 14,056 15,224 19,540
2023 14,119 15,366 21,446
2024 14,565 15,715 22,051
मे 2025 6,474 6,957 10,141