
‘उदे गं अंबे उदे’ चा गजर करत सोमवारी ठिकठिकाणी देवीचे आगमन होणार आहे. ठाण्यात तब्बल तीन हजार 800 दुर्गादेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देवीच्या सेवेसाठी भाविक सज्ज झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तीन हजार 404 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांचा हा फैजफाटा सीसीटीव्ही, तांत्रिक यंत्रणा आणि पेट्रोलिंगच्या मदतीने शहरावर करडी नजर ठेवणार आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवरात्रीनिमित्त 3254 खासगी व 608 सार्वजनिक दुर्गादेवी मूर्तीची तसेच 283 खासगी व 133 सार्वजनिक प्रतिमांची स्थापना होणार आहे. दहा दिवसांत पार पडणाऱ्या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, पथसंचलन, दुर्गा दौड, यात्रा, रावण दहन अशा विविध कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. मात्र या उत्सवात शांततेचा भंग होऊ नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून 10 पोलीस उपायुक्त, 18 सहाय्यक पोलीस आयुक्त, 16 पोलीस निरीक्षक, 44 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 33 महिला पोलीस अधिकारी, 2 हजार 633 पुरुष अंमलदार, 610 महिला अंमलदार असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
साध्या वेशातील पोलीस तैनात
नवरात्रोत्सव काळात 590 सार्वजनिक ठिकाणी व 500 खासगी ठिकाणी गरब्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रास गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी तरुणाईसह सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या काळात छेडछाड, विनयभंग, हाणामारी किंवा चेन, मोबाईल, पर्स, बॅग स्नॅचिंग अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची तुकडी तैनात राहणार आहे.
समाजकंटकांवर करडी नजर
सगळीकडे धार्मिक वातावरण असताना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडीओ पाठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कुणीही आदेशाचे भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी 100, 112, नियंत्रण कक्ष किंवा 9133663839 या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.