
साहित्य रचना या सुरूवातीला मौखिक स्वरूपात होत्या. ओव्या, लोकगीते, अभंग, म्हणी, उखाणे अशा स्वरूपाच्या साहित्य रचना मौखिक वाङ्मय व पुढे लिखित म्हणून प्रचलित झाल्या. यातील ढवळे किंवा धवले ही रचना. महानुभाव संप्रदायाच्या कालखंडात उदयास आलेली धवले ही रचना विशेषत्वाने संत महदंबा यांच्याशीच जोडली जाते. त्यांचे धवळे महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहेत. हा वाङ्मयीन रचनाप्रकार ज्याची निर्मिती ‘श्रीगोविंदप्रभूचरित्रा’तील ‘विव्हावो स्विकारू’ या लीळेवरून कळते. धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची गाणी.
गोविंदप्रभू यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली. त्या गीतांत विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन आले आहे. ढवळ्यातील मुख्य विषय रूक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग आला आहे. तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे. उत्तरार्धात पासष्ट कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्रकवित्व दिसते. धवल या संस्कृत शब्दावरून ‘धवळा’ व ‘ढवळा’ हा शब्द आलेला आहे. ते विवाहप्रसंगी भक्तांकडून गायले जात असत. प्राचीन काळातील लोकगीतातील ढवळे उपलब्ध नसले तरी महदंबा, एकनाथ, दासोपंत, रामदास इत्यादी कवींनी रचलेले ढवळे उपलब्ध आहेत. महदंबेच्या ढवळ्यांची भाषा साधी, सुबोध व तात्कालिक बोलीभाषेच्या रूपाची आहे.






























































