राजस्थानच्या जयपूर शहरातील अजमेर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. इथल्या एलिव्हेटेड रोडवर धावणाऱ्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे तेथील उपस्थित लोकांमध्ये आणि इतर वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या जळत्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र जांगीड असे या कारचालकाचे नाव आहे. जितेंद्र एलिव्हेटेड रोडवरून खाली येत होता. यावेळी त्याला कारच्या एअर कंडिशनिंग युनिटमधून धूर येताना दिसला. त्यामुळे तो घाबरला आणि लगेचच कारमधून उतरला. यावेळी त्याने बोनेट उघडून कारची तपासणी केली. बोनेट उचलताना जितेंद्रला इंजिनला आग लागल्याचे दिसले.
जयपुर की सड़कों पर दौड़ी जलती हुई कार! pic.twitter.com/At6ZuixmSK
— Gaurav brar (@gauravbarar25) October 13, 2024
दरम्यान कारचालकाने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच आग वाढल्यामुळे कारचा हँडब्रेक निकामी झाला, त्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली. यावेळी धटनास्थळी उपस्थित असलेले इतर वाहनचालक आणि लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. गाडी रोडवरून खाली उतरत असताना मोटारसायकलस्वारालाही धडक दिली. दरम्यान जळत्या कारचा हा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.