Beed news – बीडमध्ये बर्निंग कारचा थरार; डॉक्टर दांपत्य बालंबाल बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडमध्ये रविवारी सकाळी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. व्हिस्टा इंडिका गाडीने अचानक पेट घेतल्याने लिंबागणेश येथील डॉक्टर दांपत्याचा जीव संकटात सापडला होता. मात्र वेळीच बाहेर पडल्याने डॉक्टर दांपत्याचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ. भारत मेंगडे व डॉ. प्रतिभा मेंगडे हे रविवारी सकाळी सव्वा 6 वाजण्याच्या सुमारास बोरखेड येथील शेताकडे निघाले होते. महाजनवाडी फाट्यावर त्यांच्या व्हिस्टा इंडीका (एमएच 23 वाय 2321) या कारमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढील काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या आगीमध्ये कार जळून खाक झाली.

वायर शॉर्टसर्किट झाल्यामुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉ. भारत मेंगडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, सय्यद अख्तर, सुमित मुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांच्यासह शिवाजी घरत, सतीश घरत, ऋषिकेश घरत, अभिषेक घरत व अक्षय घरत यांनी आग विझविण्यासाठी तत्परतेने मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.