
भोपाळमध्ये धक्कदायक घटना समोर आली आहे. तीन वर्षाच्या मुलीच्या डोळ्यात पेन्सिल घुसली आणि ती थेट डोक्यात घुसली. मात्र चिमुरडीवर तात्काळ यशस्वी शस्त्रक्रिया करत तिची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. भोपाळमधील एम्स रुग्णालयातील नेत्ररोग, न्यूरोसर्जरी आणि ट्रॉमा विभागासह आपत्कालीन टीमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे चिमुकलीला दृष्टीदान मिळाले.
रायसेन जिल्ह्यातील सुलतानपूरमधील राहणारी तीन वर्षांची मुलगी अंगणवाडीत जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला भोपाळच्या ट्रॉमा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ब्रेन इमेजिंगसह तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. यानंतर नेत्ररोग विभागाच्या आपत्कालीन पथकाने शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सर्व तयारी करत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. मुलीची प्रकृती आता स्थिर आहे.
डॉक्टरांच्या तत्परतेमुळे चिमुलीची दृष्टी वाचली. नेत्ररोग विभागाच्या अतिरिक्त प्राध्यापक डॉ. प्रीती सिंग यांनी सर्जिकल टीमचे नेतृत्व केले. या टीममध्ये डॉ. आदेश श्रीवास्तव आणि डॉ. राकेश न्यूरोसर्जरी, डॉ. भूपेश्वरी आणि ट्रॉमा इमर्जन्सीमधील डॉ. अंशू यांचा समावेश होता. मुलीच्या पालकांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.