
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विशाळगडप्रश्नी दोन्ही घटकांशी संवादातून, चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे.
ऐतिहासिक किल्ले विशाळगड येथील वादग्रस्त अतिक्रमण हटवण्यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शिवप्रेमी रविवार (दि. 14) रोजी विशाळगडावर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार शाहू महाराजांनी कोणत्याही समाजात तेढ येऊ नये यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी फोनवरून संपर्क करून याप्रश्नी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेऊन यातून मार्ग काढताना आवश्यकता असेल, तर आम्हालाही बोलवा, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे ते म्हणाले.
समाजस्वास्थ्य बिघडवणारे प्रश्न ताणले जाऊ नयेत. संवादातून मार्ग काढला पाहिजे. विषय जास्त ताणला जाईपर्यंत प्रशासनानेही वाट पाहू नये, असे सांगून विशाळगड येथे स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न आहे. अतिक्रमण हा प्रश्न केवळ एका घटकाला लागू नाही, तर सर्वांना लागू आहे. न्यायप्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही बाजूंशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असेही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.
शिवरायांची वाघनखं नेमकी कोणती हे सांगणे कठीण
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वस्तुसंग्रहालयात एक वाघनखं आहेत. अशीच वाघनखं जगभरातील वस्तुसंग्रहालयात आहेत. ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज यावर सातत्याने संशोधन आणि अभ्यास झाला पाहिजे यात दुमत नाही. पण लंडनहून आणली जाणारी वाघनखं ही खरेच छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत की नाही हे नेमके सांगणे कठीण आहे, असे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी स्पष्ट केले.