तो आला, भेटला, सही केली अन् चाहता रातोरात बनला करोडपती, धोनीच्या ‘मिडास टच’ची सर्वत्र चर्चा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिहं धोनी हा केवळ क्रिकेटसोबतच त्याच्या फॅन्ससोबत असलेल्या संबंधांसाठी देखील ओळखला जातो. अलिकडेच, धोनीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये धोनी त्याच्या चाहत्याच्या बाईकवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. एखाद्या मोठ्या क्रिकेटरची ऑटोग्राफ मिळाल्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. धोनीची ऑटोग्राफ मिळाल्यामुळे या बाईकची किंमत चाहत्यांसाठी थेट ३ कोटी रुपये झाली आहे!

धोनी सध्या रांची येथील त्याच्या फार्महाऊसवर त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी आलाय. यावेळी धोनीचा एक चाहता आपली Royal Enfield Interceptor 650 घेऊन धोनीला भेटण्यासाठी गेला. यावेळी त्यांच्यात छान गप्पा झाल्या. यानंतर धोनीने चाहत्याच्या बाईकचे कौतुक केले आणि नंतर त्या लाल रंगाच्या रॉयल एनफील्डच्या पेट्रोल टँकवर सही देखील केली. धोनीची सही मिळाल्याने चाहत्याला खूप आनंद झाला.

धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका वापरकर्त्याने विनोदाने लिहिले की, “3 लाख रुपयांची बाईक आता 3 कोटी रुपयांची झाली आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, धोनी सरांच्या ऑटोग्राफपुढे बाईकची किंमती काहीच नाही…, “Ride with Mahi?” अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तर अनेकांनी धोनीची ऑटोग्राफ मिळवल्यामुळे त्या तरूणाचे कौतुक केले आहे.