अयोध्येतील भाजपच्या पराभवावर मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया; पोस्ट व्हायरल

‘शक्तीमान’ या हिंदी टीव्ही सिरियल मधून लोकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतच एक वक्तव्य सध्या फार चर्चेत आहे. लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल 4 जून रोजी लागला. यावेळी भाजपचा अयोध्या मतदारसंघ येणाऱ्या फैजाबाद येथून दारूण पराभव झाला. या पराभवावर मुकेश खन्ना यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अभिनेते मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या फैजाबादमधील पराभवावर भाष्य केले आहे. ‘अयोध्येतील पराभवातून हे शिकले पाहिजे की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासियांचे जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोटींच्या बजेटमध्ये तेथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही कोटी ठेवणे आवश्यक आहे. मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूर जवळील खातू शाम मंदिर असो. भक्तीस्थळाला पर्यटन स्थळ होऊ देऊ नका. लोकही तिथे राहतात, त्यांचीही काळजी घ्या. असे त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

अयोध्येतील भाजपच्या पराभवावर मुकेश खन्ना यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर अनेक यूजर्सनी सहमती दर्शवली आहे. तर अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील फैजाबाद मतदारसंघात 20 मे रोजी मतदान झाले. 2024 च्या या लोकसभा निवडणुकीत सपाचे अवधेश प्रसाद विरुद्ध भाजपचे लल्लू सिंह अशी लढत होती. दरम्यान अवधेश प्रसाद यांना 5,54,289 मते मिळाली. तर भाजपचे लल्लू सिंह यांना 4,99,722 मते मिळाली. अवधेश प्रसाद यांनी फैजाबादची जागा 54,567 मतांनी जिंकली आहे.