
24 षटकांत 54 धावांची गरज होती आणि लखनौचे सारेच फलंदाज बाद झाले होते. तेव्हा मुकुल चौधरीच्या भन्नाट आणि सुसाट खेळीने लखनौला अनपेक्षितपणे शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवून दिला. विजयाच्या दारात उभ्या असलेल्या कोलकात्याची पराभवाची मालिका पुन्हा एकदा कायम राहिली.
अजिंक्य रहाणे (41), अंगकृष रघुवंशी (45) पॅमरून ग्रीन (32) आणि रोव्हमन पॉवेल (ना. 39) यांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्याला 4 बाद 181 अशी मजल मारता आली. रहाणेने रघुवंशीसह 84 धावांची भागी रचत कोलकात्याच्या डावाला आकार दिला, पण ही जोडी फुटताच कोलकात्याची 4 बाद 111 अशी अवस्था झाली. त्यानंतर ग्रीन आणि पॉवेलने 70 धावांची अभेद्य भागी रचत कोलकात्याला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
मुकुलने चमत्कार घडवला
182 धावांचा पाठलाग करताना लखनौच्या डावाला कोणीही फार काळ सावरू शकला नाही. मिचेल मार्श (15), एडन मारक्रम (22), ऋषभ पंत (10), निकोलस पूरन (13) हे आक्रमक फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे लखनौ पराभवाच्या ट्रकवर पडला होता. तेव्हा आयुष बदोनीने किल्ला लढवत संघाला शंभरी गाठून दिली. पण तोही बाद झाला. 54 धावांवर बदोनी बाद झाल्यावर लखनौ विजयापासून 57 धावा दूर होता. 7 बाद 128 अशा दुर्दशेत असलेल्या लखनौचा पराभव अटळ होता, पण तेव्हा मुकुल चौधरीचे वादळ घोंघावले आणि त्याने 7 षटकार आणि 2 चौकारांची बरसात करत संघाला पुन्हा विजयासमीप नेले. शेवटच्या 2 चेंडूंत 7 धावांची गरज असताना वैभव अरोराला ठोकलेला षटकार आणि त्यानंतर शेवटचा चेंडू चुकल्यानंतरही आवेश खानने पूर्ण केलेल्या धावेने लखनौच्या चित्तथरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. आवेशने 54 धावांच्या भागीत केवळ 3 चेंडू खेळत अवघी एक धाव केली.





























































