मुळातून पाणी सुटले तरी उजवा कालवा कोरडाच राहणार? नूतनीकरण कामाचा फटका नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना चिंता

एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नेवासा तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरिप पिकांना जीवदान मिळाले असले तरी मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार, तर लाभक्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. दरम्यान, कालपासून मुळा धरणातील अतिरिक्त पाणी नदीला सोडण्यात आले असले तरी दुरुस्ती नूतनीकरणामुळे उजवा कालवा कोरडाच राहणार आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिना संपूर्ण कोरडा गेला. सुरुवातीलाच खरिपाच्या पेरण्या झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. मात्र, तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून सोनई व तालुक्यात रिमझिम पाऊस होत असल्याने खरिप पिकांना जीवदान मिळाले. तूर, सोयाबीन, कापूस या पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड झाल्याने रिमझिम पाऊस पिकांना पोषक ठरला आहे. मात्र, लाभ क्षेत्रात मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस कोसळल्याने 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात 18 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला असून, धरण 70 टक्के भरले आहे. दरम्यान, धरणात 70 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यास जलाशय परिचरण सूचीनुसार अतिरिक्त पाणी कालवा व नदीद्वारे सोडावे लागणार आहे.

त्यामुळे कालपासून (दि. 9) मुळा धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत दमदार पाऊस नसल्याने मुळा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याची गरज आहे. मुळा धरणातील अतिरिक्त पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडण्यास सध्या तरी अडचण आहे. कारण कालव्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

उजव्या कालव्याला नूतनीकरण कामाचा फटका

मुळा उजवा कालव्यावर शंभर कोटी रुपये खर्चाचे दुरुस्ती नूतनीकरणाचे काम सुरू असून, या कामाच्या अडथळ्यामुळे मुळा उजवा कालव्यास पाणी सोडण्यास विलंब होणार असल्याचे अधिकारी सांगतात. मुळा धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जाणार असले तरी मुळा उजवा कालवा पाण्यावाचून कोरडा राहणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.