मुलुंड ऑडी दुर्घटना; चालकाला पोलीस कोठडी

दारूच्या नशेत तर्रर होऊन दोन रिक्षांना धडक देणारा व दोन रिक्षा चालकांनी दोघा प्रवाशांना जखमी करणारा ऑडी कारवाला विजय गोरे याला न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विजयला सोमवारी अपघात प्रकरणात अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले होते.

मुलुंड पश्चिमेकडील डम्पिंग रोडवर सोमवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास वेगात चाललेल्या ऑडी कारने समोरून येणाऱया एका रिक्षाला जोराची धडक दिली होती. त्यामुळे ती रिक्षा दुसऱया रिक्षावर आदळली. या अपघातात संतोष वालेकर (49), विवेक जैस्वाल (26) या दोघा रिक्षा चालकांसह प्रकाश जाधव (46) आणि हनमंत चव्हाण (57) हे दोन प्रवाशी जखमी झाले होते. जाधव यांच्या हाताला तर उर्वरित तिघांच्या पायाला दुखापत झाली होती. या अपघातानंतर बिथरलेल्या ऑडी कार मालक विजयने कार तेथेच सोडून पळ काढला होता. नंतर मुलुंड पोलिसांनी शोध घेऊन त्याला पकडले होते. त्याला अटक केल्यानंतर आज त्याला मुलुंड न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.