
केंद्र सरकारने मुंबईतील मिठागरांची 256 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे (डीआरपीपीएल) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो धारावीकरांना अपात्र ठरवून अदानी समूह त्यांचे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीत पुनर्वसन करणार आहे. धारावीतील लोंढ्यामुळे भविष्यात या परिसरातील नागरी सोयीसुविधांवर प्रचंड ताण येणार असून मिठागराच्या जमिनीवरील बांधकामामुळे परिसर पूरमयदेखील होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मिठागरांच्या जमिनी लाडक्या बिल्डरच्या घशात घालू देणार नाही, असे म्हणत मुलुंडकर आता कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहेत.
धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली हजारो एकर जागा अदानी समूहाला दिल्या जात आहे. मिठागरांच्या जागा देण्यासाठी 23 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री विभागाने एक नवीन पॉलिसी आणली. त्यानुसार मिठागरांच्या जागा 99 वर्षांसाठी राज्य सरकार आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योगासाठी केवळ 25 टक्के दराने देण्यात येणार आहे. या जमिनी पोटभाड्याने देण्याचीही तरतूद आहे. याआधी 2012 च्या पॉलिसीनुसार मिठागरांच्या जागा केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनाच देता येत होत्या. नव्या पॉलिसीमुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी पट्ट्यातील मिठागरांची जागा अदानी समूहाला म्हणजेच धारावी प्रकल्पाला देण्यात येणार आहे. ही पॉलिसी म्हणजे केवळ धारावी आणि अदानी समूहाला नजरेसमोर ठेवून बनवली असून पुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया यात पार पाडण्यात आलेली नाही, असा आरोप मुलुंडमधील अॅड. सागर देवरे यांनी केला आहे. याविरोधात कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लढा दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
धारावीकरांना धारावीतच घरे द्या
‘अपात्र’ धारावीकरांसाठी घरे देण्याच्या नावाखाली मोदानीला जमीन दिली जात आहे, पण आम्हाला पात्र-अपात्र मान्य नाही. प्रत्येक धारावीकराने आपल्या रक्त आणि घामाने धारावी उभी केली आहे. सर्व धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईकरांचे हक्क मारायचे, मुंबईचे महत्त्व कमी करायचे आणि मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायच्या हा मोदानी अॅण्ड कंपनीचा एकमेव अजेंडा आहे. मोदानी अॅण्ड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी हे महाभ्रष्ट मोदानी सरकार वाट्टेल त्या थराला जात आहे. मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या व पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिठागरांच्या जमिनीवर भराव टापून सर्व मिठागर जमिनी लंपास करण्याचा नवीन महाघोटाळा आता मोदानी अॅण्ड कंपनीने रचला असून मुंबईच्या न्यायाच्या या लढाईत लढत राहण्याचा इशारादेखील वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.