
लोकल ट्रेन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाकडून मोठमोठय़ा घोषणा केल्या जात आहेत; मात्र वर्षानुवर्षे त्या घोषणा कागदावरच राहत आहेत. त्यामुळे ‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या उपनगरी रेल्वे मार्गावर ‘मरणयातना’ कायम आहेत. लोकलच्या गर्दीमुळे खाली पडून आणि रुळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये 8 व 9 सप्टेंबर या दोन दिवसांत 15 प्रवाशांचा मृत्यू झाला. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांत या घटनांची नोंद झाली. बहुतांश मृत्यू रूळ ओलांडल्यामुळे तसेच ट्रेनच्या धडकेत झाल्याचे रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून वेळोवेळी विविध सुविधांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करण्यात मात्र रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे ‘जीवनवाहिनी’वर मृत्यूचे सत्र सुरूच आहे.