चला, लोकल सुरू झाली; आजपासून नेहमीचे धक्के ओळखीचे बुक्के

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील तब्बल 36 तासांचा मेगाब्लॉक अखेर आज संपला. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी टिटवाळय़ासाठी पहिली लोकल रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे इंटरलॉपिंगचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 10 व 11 ची लांबी 385 मीटरने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता  या प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबू शकणार आहेत. तर लोकलसेवा सुरळीत सुरु झाल्याने उद्यापासून ‘नेहमीचे धक्के आणि ओळखीच्या बुक्क्यां’चा अनुभवही प्रवाशांना येणार आहे. दरम्यान, लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांना फायदा होणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

1 जून ते 2 जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भायखळा मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वडाळा रोड हार्बर लाईन येथे तब्बल 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल वडाळय़ापर्यंत तर मुख्य मर्गावरील लोकल दादर, परळ आणि भायखळय़ापर्यंत धावत होत्या. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवस मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली, मात्र आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सीएसएमटीवरून लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांची पुन्हा गर्दी दिसली.

सकाळपासूनच प्लॅटफॉर्मवर उसळली प्रवाशांची गर्दी

रविवारी मेगाब्लॉकमुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना आणि पर्यटकांना भायखळा, वडाळय़ावरून बेस्ट बस, रिक्षा-टॅक्सीचा आधार घ्यावा लागला. बेस्ट सेवा अपुऱ्या असल्याने बेस्टमध्ये प्रवाशांची गर्दी दिसली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मोठी अडचण झाली.

रविवारी तब्बल 235 लोकल फेऱ्या रद्द केल्याने दोन लोकलमधील वेळेचे अंतर जास्त होते. लोकल विलंबामुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली दिसली.

प्रवासी बराच काळ स्थानकात ताटकळत लोकलची वाट बघताना दिसले. लोकल मिळाली तरी ती भायखळा आणि वडाळय़ापर्यंत होती. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा बेस्टने प्रवास करावा लागला.

रिक्षा, टॅक्सी पकडून पर्ह्ट परिसर गाठणाऱ्याची संख्या मोठी होती. टॅक्सीचालकांशी हुज्जत घालतानाही अनेक प्रवासी दिसले.

मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर, कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, भायखळा या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती.

ही कामे मार्गी लागली

ओव्हरहेड इक्विपमेंट पोर्टल्सची उभारणी, सर्व 10 लाईन कव्हर करणारे 53 मीटरचे दोन विशेष पोर्टल उभारणे. फलाटांची लांबी वाढवण्याबरोबरच पॉइंट्स, सिग्नल्स, डिसी ट्रक सर्किट आणि इतर तांत्रिक कामे करण्यात आली.