Amaravati Express Hit Truck – रेल्वे अपघातामागे घातपाताची शक्यता

बोदवड येथे गव्हाची वाहतूक करणारा ट्रक बंद क्रॉसिंगवरील फाटक तोडून थेट रेल्वे रुळांवर धडकला. या वेळी समोरून येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसने या ट्रकला फरफटत नेले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. प्रथमदर्शनी हा अपघात असला तरी घातपाताची शक्यता गृहीत धरून रेल्वे प्रशासनाने उच्च स्तरावर चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी मलकापूर आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खंडवा येथून तामीळनाडूकडे निघालेला ट्रक उड्डाणपुलावरून न जाता बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर आला. तेथील फाटक तोडून चालकाने ट्रक पुढे भुसावळ-नागपूर रेल्वेमार्गाच्या डाऊन लाइनवर आणला. या वेळी बोदवड रेल्वे स्थानक सोडून मुंबई-अमरावती एक्सप्रेस मलकापूरकडे निघाली होती. या गाडीच्या धडकेत रुळावरील ट्रकचे दोन तुकडे झाले.