
मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगरप्रदेश जोडण्यात येणार आहे. त्यासाठी अखंड कनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन विमानतळांना मुंबई मेट्रो मार्ग 8 ने जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर विकसित करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला प्रमुख आर्थिक केंद्रांचा विकास होत आहे. भविष्यात या भागात कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. या विमानतळांमध्ये आंतरजोडणी त्यासाठी करावी लागणार आहे. तसेच रस्ते व रेल्वेमार्ग विकसित करून मुंबई महानगर प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई मेट्रो मार्ग 8 या मार्गिकेमध्ये बहुतांश लांबी नवी मुंबई परिसरात आहे. तसेच नवी मुंबई विमानतळ हा सिडकोमार्फत विकसित करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 8 याबाबतचा प्रकल्प अहवाल सिडकोकडून तयार करण्यात येणार आहे. एमएमआरडीएला त्यासाठी सुसाध्यता अहवाल तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल आणि कागदपत्रे तत्काळ सिडकोकडे सुपूर्द करण्यास सांगण्यात आले आहे. शासनाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.