
मुंबईतून अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू चौदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे. हा महामार्ग पुण्याच्या रिंगरोडला जोडला जाणार असून पुढील सहा महिन्यांत कामाला सुरुवात होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठात अभियंता दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी यांनी ही माहिती दिली.
गडकरी म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री असतांना मुंबई-पुणे एक्प्रेस वे पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधण्यात आला होता. मात्र, हा एक्प्रेस-वे आता अपुरा पडू लागला आहे. आजच माझा मुलगा आणि त्याची पत्नी लोणावळ्यात वाहतूक कोंडीत अडकले. त्यामुळे ते वेळेत पुण्यात येऊ शकले नाही. त्यापेक्षा कमी वेळेत मी नागपूरहून पुण्यात आलो. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अटल सेतू ते पुण्याच्या रिंग रोडपर्यत नवीन महामार्ग तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग पुण्याच्या रिंगरोडला जोडला जाणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तसेच हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
55 लाख कोटींचे टार्गेट
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये हिंदुस्थानचा जगामध्ये सातवा क्रमांक होता. मात्र, आता जपानला मागे टापून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ज्या प्रमाणे विकास सुरू, संशोधन सुरू आहे त्यावरून येणाऱ्या 5 वर्षांत ऑटोमोबाईल इंडस्ट्री 55 लाख कोटींवर गेली पाहिजे, हा मानस आहे. ही गोष्ट कठीण आहे पण अशक्य नाही, असे ही गडकरी म्हणाले.
सध्या देशात सुमारे 65 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात असून, शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्त्रोत आहे. देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, जोपर्यंत गाव, गरीब, कामगार, शेतकरी संपन्न होत नाही तोपर्यंत ‘आत्मनिर्भर भारताचे’ स्वप्न साकार होणार नाही, असे गडकरी म्हणाले.
इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी
पूर्वी विकास कामांना निधीची कमतरता भासायची. मात्र, सध्याच्या घडीला विकास कामे करताना निधीची कमतरता भासत नाही. या देशात काम करण्यासाठी पैशाची कमी नाही. तर, इमानदारीने काम करणाऱ्या लोकाची कमतरता आहे, अशी खंतही गडकरी यांनी व्यक्त केली.
काहींचे बायकोपेक्षा फाईलवर जास्त प्रेम
काही वेळा प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल चुकीच्या पद्धतीने केले जातात. त्यामुळे अपघात होतात, लाखो लोक जखमी होतात. प्रशासनात काही न्यूटनचे बाप आहेत. जेवढं वजन टाकाल तेवढी फाईल लवकर पुढे सरकते. काही जणांचे तर आपल्या बायकोपेक्षा फाईलवर जास्त प्रेम असते. तीन-तीन महिने ते फाईल पुढे सरकवतच नाहीत’, अशा शब्दांत गडकरी यांनी कान उपटले.