
मुंबईत उमेदवारी अर्जांसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. पहिल्या दोन दिवसांत तब्बल 7009 अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच 4 हजार 165 अर्जांची विक्री झाली होती, तर आज दुसऱ्या दिवशी 2 हजार 844 अर्जांची विक्री पालिकेच्या निवडणूक कार्यालयांतून झाली.
मंगळवारपासून अर्ज विक्री आणि अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू केली आहेत. वॉर्डमध्ये कक्ष उभारून जाती आणि प्रवर्गनिहाय व्यवस्था पालिकेने तैनात ठेवली आहे. या ठिकाणी अर्ज स्वीकृतीसाठी इच्छुकांच्या रांगा लागत आहेत. उमेदवारांना 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
फक्त दोन अर्ज दाखल
23 डिसेंबरपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नाही. तर आज दुसऱया दिवशी ‘एन’ विभाग घाटकोपर आणि ‘के’ विभाग अंधेरीमध्ये प्रत्येकी एका उमेदवाराकडून अर्ज सादर करण्यात आला. दरम्यान, उद्या, 25 डिसेंबर रोजी नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज विक्री-स्वीकृती बंद राहणार आहे.




























































