मुंबईच्या कांदळवनात बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बस्तान! आजपासून कोम्बिंग ऑपरेशन

मुंबईतील मालाड, मालवणी, मनोर, गोराईत कांदळवनांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशी, रोहिंग्यांना हटवण्यासाठी उद्यापासून दोन दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. तसेच कांदळवनांचे गुगल मॅपिंगही येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिले.

सत्ताधारी भाजपकडून यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. वडाळय़ात शांतीनगरमध्ये बेकायदा झोपडय़ांमध्ये 160 बांगलादेशी पकडले गेले होते. तिथून जवळच भाभा अणुशक्ती केंद्र आहे. बांगलादेशी, रोहिंग्यांनी त्यावर रॉकेट लाँचर डागले तर कोण जबाबदार, असा सवाल करण्यात आला होता.