
विघ्नहर्ता गणरायाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. तत्पूर्वी वीकेण्डचा मुहूर्त साधत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तसेच मंडळांनी साकारलेले नयनरम्य देखावे पाहण्यासाठी रविवारी लालबाग-परळसह गिरगावातील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते.
उंचच उंच गणेशमूर्ती आणि नयनरम्य देखावे हे शहरातील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण. सात दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर शनिवारपासून सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली. रविवारीदेखील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा, नरेपार्कचा राजा, रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती या लालबाग-परळमधील मानाच्या गणपतीसह पर्ह्ट तसेच खेतवाडीतील 13 गल्ल्यांमध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. उपनगरातील बोरिवली, मालाड, घाटकोपर येथेही भाविक सहकुटुंब रांगेत उभे असलेले दिसत होते. बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे, मेट्रोची सेवादेखील रात्री उशीरापर्यंत सुरु होती. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.