मुंबई-गोवा महामार्गाची तेरा वर्षांपासून रखडपट्टी, अपघातांमध्ये वाढ; यंदाच्या गणेशोत्सवातही हाल?

मुंबई-गोवा महामार्ग तेरा वर्षांपासून रखडला आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार 600 कोटी रुपये खर्च झाला आहे, पण तरीही महामार्गावर वाहतूक करणे गैरसोयीचे झाले आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. हा महामार्ग डिसेंबर 25पर्यंत खुला करण्याची योजना आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईतून जाणाऱ्या चाकरमान्यांचे या वर्षीही हाल होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार व अन्य सदस्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी लेखी उत्तरात सविस्तर माहिती दिली आहे.

कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेने

कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाच्या कामामध्ये दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्यातून वाहतूक सुरू आहे. उर्वरीत दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून मार्च 2025 पर्यंत दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना आहे. कशेडी बोगदा कायमस्वरूपी वापर व सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावर असलेल्या कामांवर आतापर्यंत एकूण 3 हजार 857 कोटी 85 लाख रुपये खर्च झाले आहेत. या मार्गावरील सुमारे दहा किमी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम शिल्लक असून ही कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

पनवेल-कासू पुलांचे काम मार्चअखेर

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांपैकी एकूण 84.60 किमी लांबीच्या रस्त्यापैकी 74.80 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरीत पनवेल ते कासू या 42.30 किमी लांबीच्या रस्त्यावरील मोठे पूल-उड्डाणपुलांचे काम मार्च 2025पर्यंत आणि कासू ते इंदापूर या 42.30 किमी लांबीच्या मार्गावरील मोठे पूल-उड्डाणपुलांचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

उड्डाणपूल वगळता रस्ता पूर्ण होणार

या महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम) विभागामार्फत प्रगतीपथावर असलेल्या कामांवर आतापर्यंत एकूण साडेचार हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. सद्यस्थितीत एकूण 355.28 किमी लांबीपैकी 319.90 किमी लांबीतील काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर असून मोठे पूल आणि उड्डाणपूल वगळता अन्य कामे मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.