
भावाच्या तंबाखू खाण्याच्या सवयीला कंटाळून त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेल्या व्यक्तीची शिक्षा न्यायालयाने कमी केली आहे. जन्मठेपेची शिक्षेचे न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेत रुपांतर करत आरोपीला दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
कांजूरमार्ग-पूर्व परिसरातील रहिवाशी असलेला साईनाथ याला वारंवार तंबाखू खाण्याचे व्यसन होते. भावाच्या या सवयीला कंटाळून आरोपी हेमंतने साईनाथची सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने मारहाण करून हत्या केली. याप्रकरणी सत्र न्यायालयाने 19 ऑक्टोबर 2024 रोजी हेमंतला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मृत साईनाथ वारंवार तंबाखू थुंकून घरात अस्वच्छता पसरवायचा. तसेच आजारी असूनही हेमंतला मारहाण करत असे. त्याचे हे वर्तन कुटुंबासाठी असह्य झाले होते. हेमंतने अनेकदा त्याला व्यसन सोडून सुधारण्याची विनंती केली होती, मात्र साईनाथने त्याकडे दुर्लक्ष केले. याच संतापातून हेमंतने साईनाथच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्याची हत्या केली होती. ही हत्या पूर्वनियोजित नव्हती, असे निरिक्षण न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने नोंदवले.
सततचा छळ आणि तत्कालीन वादातून उफाळलेल्या रागाच्या भरात हेमंतच्या हातून हे कृत्य घडले. त्यामुळे हे प्रकरण हत्येचे नसून सदोष मनुष्यवधाचे आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा 10 वर्षांच्या सश्रम कारावासामध्ये रुपांतरित केली.


























































