‘हमारे बारह’च्या निर्मात्यांचे हायकोर्टापुढे लोटांगण

मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या संवादांमुळे वादात सापडलेल्या ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयापुढे लोटांगण घातले. चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद दिवसभरात हटवू व शनिवारपासून ते संवाद नसलेला चित्रपट दाखवू, अशी हमी निर्मात्यांनी दिली. त्याआधारे न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाला मुभा दिली.

धार्मिक भावना व व्यावसायिक हित असा समतोल साधत न्यायमूर्ती कमल खाता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने गुरुवारी चित्रपट प्रदर्शनावरील स्थगिती उठवली. तसेच प्रदर्शनापूर्वी चित्रपट सेन्सॉर बोर्डाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला दाखवावा व समितीने आपले मत तातडीने कळवावे, असे निर्देश दिले. त्या अनुषंगाने खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी निश्चित केली. तथापि, समिती अहवाल देण्यास अपयशी ठरली. या वेळी याचिकाकर्त्या अझर तांबोळी यांनी समितीच्या अहवालाशिवाय चित्रपट प्रदर्शनाला मुभा देण्यास विरोध केला, तर समितीच्या अपयशामुळे चित्रपट प्रदर्शन रोखू नका, अशी भूमिका निर्मात्यांनी  मांडली. तथापि, खंडपीठाने कायदा-सुव्यवस्थेचा विचार करीत कठोर भूमिका घेताच निर्मात्यांनी वादग्रस्त संवाद हटवण्याची हमी दिली.