
बनावट सिगारेटच्या विक्रीला व उत्पादनाला उच्च न्यायालयाने अंतरिम मनाई केली आहे. बनावट सिगारेटची विक्री आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
गोल्ड फ्लॅक सिगारेट कंपनीने ही याचिका केली आहे. त्यांच्या नावाने रायगड येथे बनावट सिगारेट तयार केली जाते. त्याची विक्री केली जाते. यास न्यायालयाने मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कंपनीच्या नावे बनावट सिगारेट तयार करून त्याची विक्री होत असल्यास हे ग्राहकांची दिशाभूल करण्यासारखे आहे. यास तातडीने आळा घालायला हवा, असे स्पष्ट करत न्यायालयाने हे मनाई आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 10 डिसेंबरला होणार आहे.
कंपनीचा दावा
आमच्याकडे गोल्ड फ्लॅक नावाचा ट्रेडमार्क आहे. याची रीतसर नोंदणी केली आहे. तरीही या नावाने बनावट सिगारेट तयार केली जाते. यासाठी घातक द्रव्यांचा वापर केला जातो, असा दावा कंपनीने केला.
गुन्हा दाखल
कंपनीने गेल्या वर्षी पोलिसात याचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार रायगड पोलिसांनी बनावट सिगारेट बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. उत्पादनाचे यंत्र जप्त केले. पोलिसांनी याचे आरोपपत्रही दाखल केले आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

























































