
फोर्ट येथील स्टॉक एक्स्चेंजजवळ सुरक्षेच्या कारणास्तव खासगी वाहनांना बंदी असतानाही स्टॉक एक्स्चेंजजवळील कार्यालयात वाहन नेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. सुदृढ व्यक्ती 300 मीटर नक्कीच चालत जाऊ शकते, असे सुनावत न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली.
याचिकाकर्ते संजय बाफना यांचे दलाल स्ट्रीट येथील विणा चेंबर्समध्ये कार्यालय आहे. या इमारतीच्या आवारात खासगी पार्ंकगची जागा असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या भागात बॅरिकेड्स लावून खासगी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्याने अॅड. मूताहर खान आणि अॅड. यश धाकड यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगण्यात आले की, 2012 साली याचिकाकर्त्याच्या वडिलांना त्यांच्या आजारपणामुळे आणि वयामुळे न्यायालयाने केवळ ‘ड्रॉप अॅण्ड गो’ (सोडणे आणि परतणे) या तत्त्वावर त्या भागात वाहन नेण्याची मुभा दिली होती ती मुभा न्यायालयाने कायम करावी.
न्यायालयाचे निरीक्षण काय?
- शेअर बाजार इमारतीला उडवून देण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता आणि आजही तेथे सुरक्षेचा धोका कायम आहे. त्यामुळे रस्ते बंद करणे किंवा अडथळे निर्माण करणे हे प्रशासनाचे पाऊल योग्य आहे.
- याचिकाकर्त्याच्या वडिलांना दिलेली सवलत हृदयविकार आणि ज्येष्ठ असल्याने होती. याचिकाकर्त्याला असा कोणताही आजार नाही.





























































