
तान्हा बाळाची काळजी आईच घेऊ शकते, असे नमूद करत उच्च न्यायालयाने एका पतीला चांगलीच चपराक दिली. एक वर्षाच्या मुलीचा ताबा पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले.
बाळाला आईचे दूध अत्यावश्यक असते. या काळात बाळ आईच्या जवळच हवे. त्यासाठी पतीने मुलीचा ताबा पत्नीकडे द्यावा, असे न्या. सारंग कोतवाल व न्या. संदेश पाटील यांनी नमूद केले. पती कामाला जातो. पत्नी तिच्या आईवडिलांसोबत राहते. अशा परिस्थितीत पतीपेक्षा पत्नीच मुलीचा सांभाळ चांगल्या प्रकारे करु शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या जोडप्याचा 2023 मध्ये विवाह झाला. सासरचे पत्नीचा मानसिक छळ करायचे. बाळ झाल्यानंतर तिला घरातून हिसकावून बाहेर काढण्यात आले. मात्र बाळाला आईच्या दुधाची गरज आहे. मुलीचा ताबा मला देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका पत्नीने दाखल केली. न्यायालयाने पत्नीची मागणी मंजूर केली.



























































