IPL 2026 – मुंबई इंडियन्सची पराभव हॅटट्रिक, आरसीबीच्या धावांच्या डोंगरापुढे मुंबईची दमछाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज मुंबईच्या वानखेडेवर बंगळुरूच्या (आरसीबी) फलंदाजांची दहशत होती. फिल सॉल्ट, विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या घणाघाती खेळींनी उभारलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा मुंबई इंडियन्स पाठलागही करू शकली नाही. शेरफेन रदरफोर्डने 9 षटकारांचा वर्षाव करत मुंबईला 222 धावांपर्यंत नेले, पण ते कधीही विजयासमीप नव्हते. त्यामुळे आरसीबीने 18 धावांनी जोरदार विजय मिळवत आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली, तर मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

आघाडीवीरांकडून अपेक्षाभंगच

241 धावांचा पाठलाग करताना रायन रिकल्टनने झंझावाती सुरुवात केली. रोहित शर्मासह त्याने अर्धशतकी सलामी दिली. पण धावफलकावर 57 धावा लागल्या असताना पायाचे स्नायू ताणले गेल्याने रोहितने 19 धावांवरच जखमी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मुंबईच्या डावाला नजर लागली. सुयश शर्माने एकाच षटकांत रिकल्टनचा झंझावात 37 धावांवर संपवला. तर तिलक वर्माची विकेट काढत मुंबईला दुहेरी धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पंडय़ाने 40 धावा काढल्या असल्या तरी मुंबईच्या डावाला कुणीही विजयी ट्रकवर आणू शकला नाही. गोलंदाजांप्रमाणे मुंबईच्या आघाडीवीरांनीही अपेक्षाभंगच केला.

रदरफोर्डने पराभवाचे अंतर केले कमी

विजयापासून 96 धावा दूर असताना शेरफेनने आपल्या बॅटची फटकेबाजी दाखवायला सुरुवात केली, पण तो संघाला विजयासमीप नेऊ शकला नाही. त्याने 18 व्या षटकांत जेकब डफीला 3 षटकार खेचत सामन्यात जान आणली. पण 19 व्या षटकांत भुवनेश्वरने केवळ 9 धावाच दिल्याने मुंबईचे विजयाचे अंतर 6 चेंडूंत 45 इतके झाले. रदरफोर्डने रोमारिओ शेफर्डला 4 षटकार ठोकत केवळ पराभवाचे अंतर कमी केले. त्याने 31 चेंडूंत नाबाद 78 धावा ठोकल्या.

सॉल्टकोहलीचा शतकी धमाका

फिल सॉल्ट आणि विराट कोहली दोघांनीही या मोसमात प्रथमच शतकी सलामी देत वैयक्तिक अर्धशतकेही झळकावली. सॉल्टने  36 चेंडूंत 78 धावांची खेळी करताना 6 षटकारांचा वर्षाव केला. त्याला रोखण्यात मुंबईच्या एकाही गोलंदाजाला यश लाभले नाही. अखेर 11 षटकांत 120 धावांची सलामी दिल्यानंतर सॉल्टची आक्रमक फलंदाजी थांबली. त्यानंतर विराट कोहलीने वन डे क्रिकेटला साजेशी अर्धशतकी खेळी साकारताना रजत पाटीदारसोबत 65 धावा जोडल्या. कोहलीने 38 चेंडूंत 50 धावा केल्या. मात्र 53 धावा काढण्यासाठी पाटीदारने केवळ 20 चेंडू घेतले. त्याने या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकारांची आतषबाजी केली. टीम डेव्हिडने शेवटी 3 षटकार आणि 2 चौकार खेचत संघाला 240 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली.

मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई

मुंबईचा एकही गोलंदाज आपला प्रभाव पाडू शकला नाही. ट्रेंट बोल्टने आपल्या गोलंदाजीवर 50 धावा उधळल्या तर मयंक मार्कंडेला 2 षटकांत फोडून काढत 40 धावा वसूल केल्या. जसप्रीत बुमराही आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवू शकला नाही. शार्दुल ठाकुर, हार्दिक पंडय़ा यांनाही आरसीबीच्या फलंदाजांनी ठोक ठोक ठोकले.