पश्चिमसह हार्बरवर आज मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा


विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान तसेच वांद्रे येथे पाचव्या मार्गिकसाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम मार्गावरील वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे स्थानक पाचव्या मार्गिकेवर तसेच मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत घेण्यात येणार असून ब्लॉक काळात वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे यांच्यातील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 18 साठी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत सीएसएमटीसाठी सुटणाऱया मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल, बेलापूरच्या दिशेने सुटणाऱया डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत तसेच ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱया गाडय़ा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत बंद राहतील.

ठाणे ते डोंबिवलीदरम्यान उद्या 10 वाजेपर्यंत ब्लॉक

एल्फिन्स्टन पुलाच्या कामाबरोबरच ठाणे आणि डोंबिवली स्थानकांमधील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. त्या कामासाठी शनिवारी रात्रीच विशेष ट्रफिक पॉवर ब्लॉकघेण्यात आला आहे. ठाणे ते डोंबिवलीदरम्यान शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मुलुंड ते ठाणे (क्रॉसओव्हर्स वगळून) आणि दिवा (क्रॉसओव्हर्स वगळून) ते डोंबिवली (प्लॅटफॉर्मसह) अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे.