पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे महिनाभर हाल होणार, दररोज लोकलच्या 80 फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वे प्रशासनाने कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. शनिवारी रात्रीपासून हे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी रेल्वेने 30 दिवसांचा ब्लॉक जाहीर केला असून हा ब्लॉक 18 जानेवारीपर्यंत चालणार आहे. पुढील महिनाभर दररोज लोकलच्या 80 हून अधिक फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

नाताळ तसेच ‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत. याच दरम्यान पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन्ही स्थानकांवर अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेडशी संबंधित विविध कामे केली जाणार आहेत. त्याचा लोकल ट्रेन आणि मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिली. सहाव्या मार्गिकेचे काम करताना पाचव्या मार्गिकेवरील गाडय़ांची वाहतूक बंद केली जाईल, तर इतर मार्गिकांवर गाडय़ांचा वेग कमी ठेवण्यात येईल. रात्री 11 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. याकाळात पाचव्या मार्गिकेवरील सर्व मेल-एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन अंधेरी/गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी, दररोज 80 हून अधिक लोकल ट्रेन रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.