मुंबई महानगर प्रदेशात 10 जलवाहतूक मार्ग सुरू होणार, राज्य सरकारकडून चाचपणी सुरू

गेल्या 30 वर्षांत मुंबई आणि महानगर प्रदेशातील अनेक जलवाहतूक बंद झाले आहेत. प्रवाशांची वाणवा आणि अव्वाच्या सव्वा भाडं यामुळे हे मार्ग बंद करण्यात आले होते. असे असले तरी राज्य सरकार मुंबई महानगर प्रदेशात 10 नवीन जलवाहतूक मार्ग सुरू करणार आहे. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या चार मार्गांचा समावेश आहे.

वाहतूक कोंडी कमी करणे, किनारी वाहतूकीतून महसूल वाढवणे असे या जलवाहतुकीचे मुख्य उद्देश आहे. कोची वॉटर मेट्रो, जी कोची परिसरात अंतर्गत जलवाहतूक सेवा चालवते, ती प्रस्तावित 10 मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सल्लागार संस्थेला प्रवासी चढण-उतरण सर्वेक्षण, प्रस्तावित जेटीजवळील प्रभावक्षेत्राचा अभ्यास, त्या भागातील प्रवासी वापराचे सर्वेक्षण, घरगुती व प्राधान्य सर्वेक्षण, प्रवास मागणी विश्लेषण, टर्मिनल सुविधा नियोजन आणि टर्मिनल्सचे संकल्पनात्मक आराखडे तयार करणे अशा विविध अभ्यासांचे काम करावे लागणार आहे.

सध्या मुंबई महानगर प्रदेशात 21 मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू आहेत. हे सर्व मार्ग अनेक दशकांपासून चालू आहेत आणि प्रामुख्याने जेटीजवळील स्थानिक लोकांनाच सेवा देतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 1992-93 मध्ये दमाणी शिपिंग कंपनीला गेटवे ऑफ इंडिया-नवी मुंबई तसेच पश्चिम किनाऱ्यावर जुहू ते गिरगाव चौपाटी यांदरम्यान होव्हरक्राफ्ट सेवा सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जास्त भाड्यांमुळे हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले.

पुढील दशकांत जलवाहतूक सेवांसाठी अनेकदा निविदा काढल्या गेल्या, पण बहुतांश वेळा सेवा सुरूच झाल्या नाहीत. 2003 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सत्यगिरी शिपिंगला शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट दिले होते. 2010 मध्ये नरिमन पॉईंट ते बोरीवली जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट प्रतिभा इंडस्ट्रीजला देण्यात आले होते. 2015 मध्ये बेलापूर-नेरुळ दरम्यान फेरी सेवेसाठी निविदा दिली गेली. मात्र सर्वच करार रद्द करण्यात आले कारण एकाही प्रकरणात फेरी सेवा सुरू झाली नाही.