
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर रुग्णालय आणि पोलीस मदत केंद्र नसल्याने गेल्या आठ महिन्यांत २५ अपघात झाले आहेत. यात २६ प्रवासी मृत्युमुखी पडले असून अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर सरकारला जाग येईल, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सरकारच्या बेपर्वाईमुळे वारंवार अपघात होत आहेत. मात्र असे असतानाही महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर (हॉस्पिटल) नसल्याने अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना संपर्क करण्यासाठी ११२ पोलीस मदत केंद्रांची मदत घ्यावी लागते, परंतु स्थानिक पोलिसांना अपघातस्थळी पोहोचण्यासाठी शहापूर व इगतपुरी येथून मोठा फेरा मारून यावे लागते. यामध्ये बराच वेळ निघून जातो. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाशाळा बोगदा ते भिवंडीदरम्यान स्वतंत्र पोलीस ठाणे आणि स्वतंत्र ट्रॉमा केअर सेंटर उभारावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
१ महामार्गावरील रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने गाडीचे टायर गरम होऊन फुटतात आणि अपघात होतात. यामुळे अपघातात वाढ झाली आहे.
२ अपघातग्रस्तांना कोणत्याही प्रकारची मदत टोल २ प्रशासन किंवा समृद्धी महामार्ग व्यवस्थापन यांच्याकडून मिळत नाही. त्यामुळे अपघातग्रस्तांचा तडफडून मृत्यू होतो.
३ इगतपुरी ते आमनेदरम्यान अपघात झाल्यास दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा मारून अपघातग्रस्तांना रुग्णालय गाठावे लागते.
४ महामार्गावर आमने (भिवंडी) ते सिन्नर या १२० किलोमीटरच्या अंतरावर हॉटेल, पेट्रोल पंप, गॅरेज यासह क्रेन, रुग्णालय या गोष्टी उपलब्ध नाहीत.
खर्डी-दळखण येथे समृद्धी महामार्गावर एक्झिट दिल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार व पोलीस मदत मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल. यासाठी शासनाने खर्डी-दळखण येथे एक्झिट द्यावी.
भाई देहेरकर, उपतालुकाप्रमुख, शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे)


























































