
मिंध्यांनी मुंबई महानगरपालिकेला कंत्राटदारांची कीड लावलीय. रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे पावसामुळे जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आता निवडणुका घेऊन ही कीड दूर करावीच लागेल, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या कामांबद्दल संताप व्यक्त केला. पावसाळा सुरू झाला असला तरी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, नालेसफाईदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कामाचा घोळ आणि घोटाळा आता जनतेसमोर आला आहे, असे ते म्हणाले.
मुंबई खड्डेमुक्त आणि पूरमुक्त करण्याचे आश्वासन मिंधे सरकारने दिले होते. पण रस्त्यांवरील खड्डे तसेच आहेत. रस्त्यांच्या कामातून फक्त त्यांच्या लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरले गेले आहेत. नालेसफाईचा दावा करण्यात येत असला तरी मुंबईतील परिस्थिती आपल्यासमोर आहे. पुण्यातही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसत होते. यापूर्वी असे कधीच होत नव्हते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई महानगरपालिका 25 वर्षे शिवसेनेकडे होती. त्यावेळी पावसाळा येण्यापूर्वी संबंधित यंत्रणांची बैठक बोलवून उपाययोजना केल्या जात होत्या. जनतेच्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देत होतो. महायुती सरकारने तशी बैठकही घेतली नाही. मुंबईचे पालकमंत्री तर फक्त बंगले, गाडय़ांसाठी बैठका घेत आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री आशीष शेलार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
गेल्या तीन वर्षांत जनतेने समस्या कोणाकडे मांडायच्या अशी परिस्थिती आहे. लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरणे, पक्षांची फोडोफोडी, पैसे देऊन नगरसेवक फोडणे हीच कामे सुरू आहेत. जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळच नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारला फटकारले.
घोटाळ्यांची न्यायालयाकडून चौकशी करा
गेल्या तीन वर्षांत मिंध्यांनी फक्त मुंबई महापालिकेला लुटण्याचे काम केले. एसंशिं यांनी मुंबईचा पैसा लुटला आहे. मिठी नदीचे काम असो, गाळ काढण्याचे काम असो वा रस्त्यांची कामे, या सर्वांची न्यायालयाकडून सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.