
आर्थिक संकटातून वाटचाल करीत असलेल्या एसटी महामंडळाला महापालिका निवडणुकांनी चांगलाच आधार दिला आहे. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मुंबई विभागातून एसटीच्या 101 बसगाड्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत तैनात केल्या होत्या. त्या दोन दिवसांत महामंडळाच्या तिजोरीत 38 लाखांहून अधिक रकमेची भर पडली. संपूर्ण राज्यभरात महामंडळाने कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कमावले.
बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा कार्यरत होती. त्यात एसटी महामंडळाचा समावेश होता. बोरिवली आरटीओने महामंडळाच्या मुंबई विभागातून 101 गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र. 9 ते 49 दरम्यानच्या विविध मतदान केंद्रांवर एसटीने सेवा दिली. परळ, मुंबई सेंट्रल, कुर्ला आणि पनवेल या आगारांतून जादा गाड्या ‘इलेक्शन ड्युटी’ला दिल्या होत्या. एसटीच्या जादा गाड्या पुरवल्या जातात तेव्हा 24 तासांसाठी 300 किमीचे भाडे आकारले जाते. निवडणूक कार्यालयाकडून एसटीच्या प्रत्येक बससाठी 19 हजार रुपयांचे आगाऊ भाडे घेण्यात आले. त्यामुळे मतदान व मतमोजणीच्या दोन दिवसांत 101 एसटी गाड्यांच्या सेवेतून महामंडळाला 38 लाखांहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई विभागाव्यतिरिक्त इतर पालिका निवडणुकांच्या सेवेतून मिळालेले उत्पन्न कोट्यवधी रुपयांच्या घरात गेले आहे. पालिकांपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या प्रक्रियेतील ‘इलेक्शन ड्युटी’मुळे मोठे उत्पन्न मिळण्याची आशा एसटी महामंडळाने बाळगली आहे.
पोलीस, होमगार्डसाठी 9 जादा गाड्यांचे बुकिंग
निवडणूक ड्युटी करणाऱ्या पोलीस आणि होमगार्डसाठी एसटीच्या मुंबई विभागातून 9 जादा गाड्यांचे बुकिंग करण्यात आले. मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला आगारातून प्रत्येकी तीन एसटी राज्याच्या ग्रामीण भागात सोडण्यात आल्या. त्यातूनही महामंडळाला वाढीव उत्पन्न मिळाले आहे. अशा प्रकारच्या ग्रुप बुकिंगचा महामंडळाच्या उत्पन्नवाढीमध्ये मोठा हातभार लागतो, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.






























































