नालेसफाई कंत्राटदार तीन वर्षांसाठी काळय़ा यादीत; गाळ काढण्याच्या कामात फसवणूक

एम पश्चिम विभागातील लहान नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात फसवेगिरी करणाऱया पंत्राटदाराविरोधात कारवाईचा बडगा उगारत मुंबई महानगरपालिकेने तीन वर्षांसाठी काळय़ा यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

एम पश्चिम विभागातील लहान नाले, रस्त्याच्या कडेला असणारी गटारे, कल्व्हर्ट, पूर्व द्रुतगती महामार्गालगतची गटारे व मोरी यातून गाळ काढून स्वच्छतेचे काम भूमिका ट्रान्सपोर्टला देण्यात आले होते. या कामांदरम्यान कंत्राटदार गाळासोबतच राडारोडा मिश्रण करून पर्यायाने गाळाचे वजन वाढवत असल्याची तक्रार पर्जन्य जलवाहिनी विभागाकडे आली होती. या तक्रारीसमवेत व्हिडीओही होता. यात वाहनाचा क्रमांक दिसत होता. या वाहन क्रमांकाच्या आधारे हे वाहन कोणत्या पंत्राटदाराकडे नोंदणीकृत आहे, व्हिडीओ कोणत्या दिवसाचा आहे याची माहिती काढण्यात आली. एआयद्वारे त्या वाहनाच्या इतर खेपांची तपासणी करण्यात आली. त्यात गाळ काढताना, भरताना आणि विल्हेवाट लावतानाचे व्हिडीओ तपासण्यात आले. त्यात राडारोडामिश्रित गाळ वाहतूक करण्यात आल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी कंत्राटदारास 28 एप्रिलला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली.

या नोटिसीवर कंत्राटदाराने केलेल्या खुलाशावर पालिकेचे समाधान न झाल्याने हलगर्जीपणा करून महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पंत्राटदाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता पालिकेने या भूमिका ट्रान्सपोर्टला तीन वर्षांच्या कालावधीसाठी काळय़ा यादीत टाकले आहे. महानगरपालिकेकडे असलेली त्यांची अभियांत्रिकीविषयक नोंदणी रद्द करण्यात आली आहे.