
दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच पोहोच रस्त्यांचे काम रखडले आहे. याची गंभीर दखल पालिका प्रशासनाकडून घेण्यात आली असून कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या पुलाचे गर्डर न आल्यामुळे काम खोळंबले आहे. यामुळे कंत्राटदाराला प्रतिदिन 20 लाख याप्रमाणे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
कर्नाक पूलाचे काम 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र, पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी लागणारे गर्डर आले नसल्यामुळे पुढचे काम रखडले आहे. पुलाचे गर्डर येत्या एक–दोन दिवसात आले तरच 10 जून रोजी पूल सुरू करता येणार आहे. अन्यथा पूल रखडण्याची शक्यता आहे.