Mumbai News – मुंबईकर कुडकुडले, आठवडाभरात थंडीचा कडाका वाढणार

cold-wave

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी राञी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पारा थेट 16 अंशांवर घसरल्यामुळे मुंबईकर चांगलेच कुडकुडले. उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे शहरात थंडीची लाट पसरली आहे. पुढील शहर आणि उपनगरांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील आठवडाभरात शहर आणि उपनगरांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईचे किमान तापमान यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळी गाठेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबई शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी किमान तापमान अचानक चार अंशांची मोठी घट झाली होती. तापमानातील तीच घसरण सोमवारीही कायम राहिली आणि रात्री थंडीची तीव्रता वाढून मुंबईकर चांगलेच कुडकुडले. यंदा पहिल्यांदाच महिनाभर थंडीचा मुक्काम कायम राहिला आहे. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून मुंबईकर या सुखद गारव्याचा आनंद घेत आहेत. सुट्टीच्या दिवशी मुंबईकर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर चौपाटी तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात थंडीचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावू लागले आहेत. हवामान खात्याने पुढील आठवड्यात किमान तापमान 15 ते 16 अंशांपर्यंत खाली येणार असल्याचे म्हटले आहे. कमाल तापमानातही मोठी घट होऊ शकते, असे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.