कांदिवलीत औद्योगिक इमारतीला आग; सुदैवाने कुणीही जखमी नाही

कांदिवली पश्चिम येथील बोनांझा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शनिवारी सकाळी 7 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

कांदिवलीच्या अशोक चक्रवर्ती रोडवरील बोनांझा इंडस्ट्रियल इस्टेट या दुमजली औद्योगिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गाळ्यात सकाळी 7 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाने सकाळी 7.30 च्या सुमारास आग श्रेणी 2 ची असल्याचे घोषित केले. घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी, पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटी, 108 रुग्णवाहिका व सार्वजनिक बांधकाम विभागाची पथके दाखल झाली.

आग विझवण्यासाठी 6 फायर इंजिन, 2 फायर टेंडर, 6 मोठे टँकर असा ताफा तैनात होता. तीन छोटय़ा होज लाइन्स आणि एका उच्चदाबाच्या लाइनचा वापर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात आला. दुपारपर्यंत आग आटोक्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाकडून सुरू आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी पिंवा कुणी जखमी झाले नाही. आगीमुळे गाळय़ाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.