
गिरगाव चर्नी रोडला जोडणाऱ्या पूलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. सैफी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या विरोधामुळे या पुलाचे काम रखडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे गिरगाव पूल बचाव समिती व मंगलवाडी-केळेवाडी रहिवासी संघटनेच्या वतीने शनिवारी सैफी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. पूल पूर्ण झालाच पाहिजे अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी यावेळी घेतली.
गिरगाव आणि चर्नी रोडला जोडणाऱ्या पूलाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. चर्नी रोड ते केळेवाडी असा पुलाचा प्रकल्प आहे. त्यासाठी निधीची तरतूदही झाली. पण सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण न्यायालायने मुंबई महापालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे 60 टक्के काम पूर्ण झाले. पण पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने कामात अडवणूक केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पुलाच्या कामाला विलंब झाल्यामुळे दोन जणांचा बळी गेला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. शनिवारी सैफी रुग्णालयाच्या विरोधात मोठय़ा संख्येने गिरगावकर रस्त्यावर उतरले. या आंदोलनात मंत्री मंगलप्रभात लोढाही सहभागी झाले होते, अशी माहिती पूल बचाव समितीचे शैलैश पोद्दार, दीपक तळेकर यांनी दिली.
























































