बीआयटी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावा! मनोज जामसुतकर यांची मागणी

पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य शासनाच्या अनेक घरकुल योजनेच्या माध्यमातून लाखो घरे बांधली जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवर मुंबईत विविध ठिकाणी बीआयटी चाळी आहेत. या जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे माझगाव-ताडवाडीसह मुंबईतील बीआयटी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी महिलांवरील वाढते अत्याचार, ‘शक्ती’ कायदा, गिरणी कामगारांची घरे, बीआयटी चाळींचा पुनर्विकास, शिक्षण, रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, जेजुरीच्या भक्तांच्या चांगल्या वैद्यकीय सुविधा अशा विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ कायदा बनवण्यात आला, मात्र अद्याप या कायद्याला केंद्राची मंजुरी मिळालेली नाही. राज्यपालांनी अभिभाषणामध्ये महिलांच्या सुरक्षितेविषयी कुठेही उल्लेख केला नसल्याबद्दल मनोज जामसुतकर यांनी खेद व्यक्त केला. शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व नामांकित कंपन्यांची औषधे वेळेवर मिळत नाहीत विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल वेळेवर मिळत नसल्यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. गरीब रुग्णांना मोफत औषधोपचार आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही याकडे मनोज जामसुतकर यांनी लक्ष वेधले.

गिरणी कामगार घरांपासून वंचित

मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे मिळावी, पण अद्याप हजारो गिरणी कामगार या घरांपासून वंचित आहेत. या गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

माहुलमधून माझगावमध्ये स्थलांतर

माझगाव-ताडवाडी येथील बी.आय.टी चाळींचा होणारा विकास जलदगतीने होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याची मागणी केली. माहुल येथे विषारी वायूच्या सान्निध्यात राहणाऱ्या माझगाव-ताडवाडीच्या स्थानिक रहिवाशांचे स्थलांतरण त्वरित माझगावमध्ये करण्याची मागणी त्यांनी केली.

पालघरमध्ये सिव्हिल रुग्णालय

पालघर जिह्याची निर्मिती होऊन दहा वर्षे उलटली तरी अद्याप तेथे सिव्हिल रुग्णालय उभारण्यात आलेले नाही. आजही स्थानिकांना उपचारासाठी मुंबई, ठाणे आणि गुजरात येथे जावे लागते. त्यामुळे पालघरमध्ये त्वरित सिव्हिल रुग्णालय बांधण्याची मागणी केली.